धुळ्यातील शासकीय विश्रामगृहात बुधवारी रात्री एक कोटी 84 लाख 84 हजार रुपयांची रोकड सापडली. अधिकाऱ्यांनी ही रक्कम आमदारांच्या समितीला देण्यासाठी जमा केल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला होता. या प्रकरणावरुन शिवसेना उबाठा नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शिवसेना शिंदे गटाला आणि आमदार अर्जुन खोतकर यांना घेरले आहे. सरकारी जागेत पैसा जमा होत आहे. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृहखाते काय करत आहे? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
संजय राऊत यांनी सांगितले की, महाराष्ट्र विधान मंडळाच्या अंदाज समितीचा तीन दिवसीय दौरा धुळ्यात सुरू झाला. या दौऱ्यात शासनाची जी विकास कामे झाली आहे, ती योग्य प्रकारे झाली की नाही? ते तपासण्याचे काम अंदाज समिती करत असते. परंतु, धुळे जिल्ह्यात या कामांमध्ये प्रचंड घोटाळे झाला आहे. भ्रष्टाचार झाला आहे. यामुळे शिवसेना नेते आमदार अर्जून खोतकर यांनी ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर १५ कोटी रुपये जमा करण्याची जबाबदारी एका ठेकेदाराने घेतली. गेल्या तीन दिवसांपासून ही रक्कम जमा होत होती. पाच कोटी रुपये जमा झाले होते. उर्वरित १० कोटी नंतर जमा होणार होते, असे राऊत यांनी म्हटले.
शिवसेना नेते आमदार अर्जून खोतकर यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु झाल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. ते म्हणाले, ही समिती विशेषता समितीचे अध्यक्ष अर्जून खोतकर किती भ्रष्ट आहे, ते समोर आले आहे. १५ कोटी जमवण्याचा प्रकार उघड झाल्यानंतर खोतकर यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहे. परंतु हे प्रकरण आता ईडी आणि सीबीआयकडे देण्याची गरज आहे.

आमदार अनिल गोटे यांचे कौतूक करत संजय राऊत यांनी सांगितले की, माजी आमदार अनिल गोटे आणि शिवसैनिकांचा दबाव वाढल्यावर हे प्रकरण उघड झाले. या प्रकरणात अडकलेले काही लोक फरार झाले आहेत. अंदाज समितीचे अध्यक्ष फरार झाले का? हे पाहावे लागले. परंतु या माध्यमातून गेल्या वर्षभरात आणि त्याच्या पूर्वीच्या अडीच वर्षात अंदाज समितीचे दौरे कुठे, कुठे झाले, त्यात काय काय झाले, हे सर्व पाहवे लागणार आहे, असे राऊत यांनी म्हटले.