back to top
Thursday, April 24, 2025
9.7 C
London

उद्धव ठाकरेंना कोकणातून दिलासा, काँग्रेसच्या बड्या नेत्याने बांधले शिवबंधन

 

Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray: शिवसेना उबाठा नेते आणि पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना गेल्या काही दिवसांपासून धक्क्यांवर धक्के बसत होते. कोकणापासून राज्यातील अनेक ठिकाणी नेते अन् कार्यकर्त्यांनी त्यांची साथ सोडली. पक्षातून केवळ आउटगोइंग सुरु होते. परंतु इनकमिंग होत नव्हते. आता कोकणातून उद्धव ठाकरे यांना दिलासा देणारी बातमी मंगळवारी आले. काँग्रेसच्या बड्या नेत्याने कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईत झालेल्या या प्रवेश सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनी त्यांचे स्वागत करत लवकरच संपूर्ण कोकण पुन्हा काबीज करणार असल्याचे सांगितले.

कोण आहेत सहदेव बेटकर?

रत्नागिरी जिल्ह्यातील कुणबी ओबीसी समाजातील नेते सहदेव बेटकर यांनी मंगळवारी शिवबंधन बांधले. ते गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसमध्ये होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून लढताना त्यांनी ५२ हजार मते मिळवली होती. त्या निवडणुकीत ते पराभूत झाले होते. पराभवानंतर ते सक्रीय नव्हते. विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर ते गुहागरमध्ये फारसे दिसले नाहीत. आता शिवसेना उबाठात येऊन ते पुन्हा सक्रीय झाले आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

सहदेव बेटकर यांचे स्वागत करत उद्धव ठाकरे म्हणाले, काही लोक शिवसेनेतून गेले मोठे झाले. पण त्यांना मोठी करणारी माणसे माझ्यासोबत आहे. शब्दाला जपणारी एकच शिवसेना आहे, दुसरी जी आहे ती गद्दार आहे. कोकणातील निकाल अनपेक्षित होता. मी परत कोकण पादाक्रांत करणार आहे. कोकणात कुणी कसा विजय मिळवला याच्या सुरस कथा समोर येतात. थापा मारणारे हात वर करून मोकळे झाले आहेत. आता पुन्हा कोकणात पक्ष मजबूत करणार आहे. तळ कोकणापासून संपूर्ण कोकण दौरा करणार आहे. पूर्ण कोकण पुन्हा काबीज करणार आहे, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

यावेळी संजय राऊत म्हणाले, महाभारतातील तीन पात्रे उपस्थित आहेत. उद्धवजी म्हणजे श्रीकृष्ण आहे. मी संजय आहेच आणि आता सोबत सहदेवही आहेत. नव्या कुरूक्षेत्रावरचे महायुद्ध आपण जिंकणार आहोत. त्यांना सांगितले आता मैदान बदलायचे नाही. रत्नागिरीतील ठेकेदारांचे राज्य उखडून टाका. उद्धव साहेब आपण कोकणात फक्त एक दौरा काढा. त्यानंतर संपूर्ण कोकण आपला असणार आहे.

Popular Categories

spot_imgspot_img