संजय राऊत हे उद्धव ठाकरेंची भाकरी खातात पण चाकरी मात्र शरद पवार यांची करतात. आपण कृतघ्नांचे शिरोमणी आहात, असे म्हणत शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे.
नरेश म्हस्के पुढे बोलताना म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जर कृतघ्न असते तर राज्यसभेच्या निवडणुकीत तुमचा पराभव केला असता. परंतू आमदारांची इच्छा नसताना देखील तुम्हाला मतदान करायला लावत खासदार केले.
राऊत कृतघ्नांचे शिरोमणी

नरेश म्हस्के म्हणाले की, ज्या आमदारांच्या मतांवर तुम्ही निवडून आलात त्याच आमदारांना तुम्ही शिव्याची लाखोली वाहत आहात. त्यामुळे कृतघ्नांचे शिरोमणी आपण आहात, असा टोला म्हस्केंनी राऊतांना लगावला आहे.
संजय राऊतांचे वक्तव्य काय?
संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना आत्मपरीक्षण केले पाहिजे. ज्या दिवशी मोदी- शहांचे छत्र उडालेले असेल तेव्हा तुम्ही कुठे असाल हा विचार शिंदे गटाने करणे गरजेचे आहे, असे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.
संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना सर्वांत जास्त ऊर्जा उद्धव ठाकरे यांनीच दिली आहे, अशी ऊर्जा त्यांना देऊ नका हा माणूस घात करेल असे सांगणारी लोकं आज त्यांच्याच आवती भोवती ठाण्यात आहे. आताचे ठाण्यातील खासदार-आमदार आहेत त्यांनीच उद्धव ठाकरेंना म्हटले होते की साहेब हा माणूस तुम्हाला धोका देईल, यांची नियत चांगली नाही. आम्ही त्याला साक्षीदार आहोत. एकनाथ शिंदे यांनी टीका सहन केली पाहिजे. राज्यकर्त्याने जर टीका केली तर तो अधिक पुढे जातील. ज्याने आपल्यावर सुरूवातीपासून मेहरबानी केली आहे त्या व्यक्तीवर टीका करताना जरा जपून बोलले पाहिजे.