back to top
Thursday, April 24, 2025
9.7 C
London

चंद्रपूरच्या सदागड हेटी गावाची अनोखी कामगिरी: महाराष्ट्रातील पहिले आदिवासी ‘सोलर व्हिलेज’, संपूर्ण गाव वीजबिलमुक्त

 

चंद्रपूर : वीज पुरवठ्याच्या समस्येमुळं शेतकऱ्यांसह ग्राहक त्रस्त आहेत. तसेच वाढत्या बिलाचा देखील मोठा ताण ग्राहकांवर येत आहे. पण महाराष्ट्रातील चंद्रपूर (Chandrapur)  जिल्ह्यातील सदागड हेटी (Sadagad Heti) हे छोटेसे आदिवासी गाव आज संपूर्ण राज्यासाठी प्रेरणास्थान बनले आहे. हे गाव आता राज्यातील पहिले आदिवासी ‘सोलर व्हिलेज’ (solar village) बनले आहे. जिथे प्रत्येक घराच्या छतावर सौर पॅनेल बसवले आहे. या गावातील नागरिकांना वीज बिल शून्य होते. आज या गावाचा हा उपक्रम महाराष्ट्रातील इतर आदिवासी आणि ग्रामीण भागाला प्रेरणा देत आहे. सौरऊर्जेने गाव तर उजळून निघाले आहेच, पण गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर आशेचा नवा किरणही चमकत आहे.

महावितरण, जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी मिळून यशस्वी केलेली पंतप्रधान ‘सूर्यघर मोफत वीज योजना’ अंतर्गत हा चमत्कार घडला आहे. गावात एकूण 20 किलोवॅटचे सौर पॅनेल बसवण्यात आले आहेत, जे दरमहा सुमारे 2,400 युनिट वीज निर्मिती करतात.

प्रत्येक घर आणि शाळेवर सोलर पॅनल

सदागड हेट्टी गावात एकूण 19 घरे व एक शाळा आहे. सर्व घरांच्या छतावर 1 किलोवॅट क्षमतेचे सोलर पॅनल बसवण्यात आले आहे. शाळेत 1 किलोवॅटचा पॅनल (अनुदान न घेता) स्वतंत्रपणेही बसवण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत गावकऱ्यांना 30000 प्रति किलोवॅटचे अनुदानही मिळाले. अवघ्या 20 दिवसांत हा प्रकल्प पूर्ण झाला आहे.

आता वीज बिलही येत नाही

गावातील रहिवासी श्रीरंग सोयाम यांनी दिलेल्या माहितीनुसार, आधी उन्हाळ्यात आमचे वीज बिल 1700 ते 1800 रुपयांचे असायचे. इतके पैसे वाचवणे अवघड होते. पण आता सोलर बसवल्यानंतर बिल शून्यावर येते. आम्ही पंतप्रधान मोदी, जिल्हाधिकारी साहेब आणि वीज विभागाचे मनापासून आभार मानतो असे ग्रामस्थांनी सांगितले. आम्हाला वीज बिलातून मोठी दिलासा मिळाला आहे.आता आमचे जीवन कमी खर्चात चालले आहे.

गाव घनदाट जंगलात वसलेले

हे गाव घनदाट जंगलात वसलेले आहे. गावकऱ्यांची उपजीविका प्रामुख्याने जंगलावर अवलंबून आहे. हवामानातील अनियमितता, वीजपुरवठा खंडित होणे आणि आर्थिक अडचणी या त्यांच्या रोजच्या समस्या आहेत. अशा परिस्थितीत सौरऊर्जेने विजेचा पर्याय तर दिलाच शिवाय सक्षमीकरणाचा मार्गही खुला केला. आमचा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त ग्रामीण भाग सौरऊर्जेशी जोडले जातील, ज्यामुळे शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षण दोन्ही सुनिश्चित होईल अशी माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली.

गावकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी कर्जाची सुविधा 

महाराष्ट्र नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेडने गावकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी कर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली. हे लोकांना मोठ्या आर्थिक काळजीशिवाय सौर पॅनेल स्थापित करण्यास अनुमती देते. सदागड हेटी हे केवळ ऊर्जा स्वयंपूर्णतेचे उदाहरण बनले नाही तर हे गाव पर्यावरण संरक्षण, ग्रामीण विकास आणि तंत्रज्ञानाच्या एकात्मतेसाठी आदर्श बनत आहे. आज गावाचा हा उपक्रम महाराष्ट्रातील इतर आदिवासी आणि ग्रामीण भागाला प्रेरणा देत आहे. सौरऊर्जेने गाव तर उजळून निघाले आहेच, पण गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर आशेचा नवा किरणही दिसत आहे.

Popular Categories

spot_imgspot_img