चंद्रपूर : चंद्रपूरच्या (Chandrapur) ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या (Tadoba-Andhari Tiger Reserve) सफारी बुकिंग मध्ये 16.5 कोटींचा अपहार करणाऱ्या अभिषेक ठाकूर (Abhishek Thakur) आणि रोहीत ठाकूर (Rohit Thakur) यांना ईडीनं चांगलाच दणका दिला आहे. या दोघांची नागपूर (Nagpur) आणि चंद्रपूर (Chandrapur) येथील 13 कोटी 71 लाखांची चल-अचल संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. यापूर्वी देखील ईडीने ठाकूर बंधूंच्या हॉटेल, बार, पेट्रोल पंप आणि घरावर छापेमारी केली होती.
नेमकं प्रकरण काय?
ताडोबा व्याघ्र प्रकल्पासाठी ऑनलाईन तिकीट बुकिंग करणाऱ्या ठाकूर बंधूंच्या चंद्रपूर वाईल्ड कनेक्टीव्हीटी सोल्युशन ने 2020 ते 2024 दरम्यान 16.5 कोटींचा अपहार केल्याचा आरोप असून या प्रकरणी वनविभागाच्या वतीने रामनगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल असून वनविभाग आणि पोलीस विभाग या प्रकरणाचा करत आहेत स्वतंत्र तपास, याच प्रकरणात वन विभागाने ईडी ला पत्र लिहून चौकशीची केली होती मागणी, त्यानुसार 8 जानेवारी ला ईडी ने ठाकूर बंधूंच्या हॉटेल, बार, पेट्रोल पंप आणि घरावर केली होती छापामारी, याच प्रकरणात आता ईडीने ठाकूर बंधूंची संपत्ती जप्त करून मोठा दणका दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रकल्प संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांच्या पुढाकाराने रामनगर पोलीस ठाण्यात ठाकूर बंधूनी केलेल्या पैशांच्या अपहाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती.
स्थानिक रामनगर पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे केंद्रीय तपास यंत्रणा ईडीने तपास सुरू केला होता. वाइल्ड कनेक्टिव्हिटी सोल्युशन्स (WCS) चे भागीदार अभिषेक विनोद कुमार ठाकूर आणि रोहित विनोद कुमार ठाकूर यांनी आर्थिक अनियमितता आणि गैरव्यवहाराद्वारे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संरक्षण प्रतिष्ठानची फसवणूक केल्याचा आरोप आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील सफारी बुकिंग, प्रवेश शुल्क, जिप्सी शुल्क आणि मार्गदर्शक इत्यादींसाठी शुल्क गोळा करण्याची जबाबदारी WCS ला देण्यात आली होती, परंतु आरोपींनी कराराच्या अटींचे उल्लंघन केले आणि २०२०-२१ ते २०२३-२४ या कालावधीत १६.५ कोटी रुपयांची उधळपट्टी केली असल्याची माहिती ईडीच्या तपासात समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ईडी अशा प्रकरणांचा वेगाने तपास करत आहे. तपासातून नवनवीन माहिती समोर येत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
