Nagpur Crime News : नागपूरच्या मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील प्रकाश नगर येथील भाजी बाजारात झालेला गोळीबार (Firing) आणि हत्येची घटना भाजीचे ठेले लावण्याच्या वादातून झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. काही गुन्हेगार स्वरूपाचे लोक प्रकाश नगर येथील आठवडी बाजार यासह नागपुरातील वेगवेगळ्या भाजी बाजारात भाजीचा व्यवसाय करत होते. वेगवेगळ्या भाजी बाजारात भाजीचे ठेले लावण्यावरून त्यांच्यात स्पर्धा आणि वाद होत होते. त्याच वादातून काल (3 मार्च) चार हल्लेखोरांनी प्रकाशनगर भाजी बाजारात एक रिव्हॉल्वर आणि काही धारदार शस्त्राने सोहेल खान नावाच्या भाजी विक्रेत्यावर हल्ला केला. गोळीबार आणि धारदार शस्त्राने केलेले अनेक वार यामुळे सोहेल खानचा जागीच मृत्यू झाला होता. तर त्याचा एक सहकारी मोहम्मद सुलतान गळ्याजवळ गोळी लागल्याने जखमी झाल्याची माहिती झोन-2 चे उपायुक्त राहुल मदने यांनी दिली आहे.
पोलिसांनी या प्रकरणी भूषण बहार उर्फ बाळू मांजरे यासह तीन आरोपींना अटक केली आहे, तर इतर तिघे अद्याप फरार आहेत. पोलिसांनी हत्येसाठी वापरण्यात आलेली रिव्हाल्वर तसेच धारदार शस्त्र जप्त केल्याचेही पोलीस उपायुक्त राहुल मदने म्हणाले.
जुन्या प्रकरणातून हत्याकांड घडवण्यात आल्याचा पोलिसांना संशय
दरम्यान याप्रकरणी मृत्यू पावलेला सोहेल खान याच्यावरही 2019 मध्ये नागपूरचा कुख्यात गुंड लकी खानवर गोळीबार केल्याचा आरोप होता. त्यामुळे या जुन्या प्रकरणातून कालचा हत्याकांड तर घडवण्यात आलेला नाही ना? अशी ही शंका पोलिसांना आहे. तर त्या दृष्टीनेही पोलिसांचा तपास सुरू आहे. मात्र या गोळीबाराच्या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

जेव्हा चोर एटीएम मशीनच उचलून नेतात…
नागपूरच्या मानकापूर परिसरात पहाटे चार वाजता तीन चोरट्यांनी पंजाब नॅशनल बँकेचे एटीएम मशीन घेऊन पसार झाल्याची घटना घडलीय. मानकापूर चौकातील पंजाब नॅशनल बँकेचे एटीएम मशीन चोरट्यांनी चार चाकी वाहनात घेऊन पसार झाले आहेत. यात एटीएममध्ये 7 लाख 58 हजाराची रक्कम असल्याची पोलिसांची माहिती आहे. दरम्यान एटीएम मशीन नेताना तीन आरोपी सीसीटीव्ही मध्ये कैद असून सीसीटीव्ही तपास करून मानकापूर पोलिस आरोपीचा शोध घेत आहे. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.