back to top
Wednesday, June 18, 2025
25.8 C
London

भाजप आमदार परिणय फुके यांच्यावर प्रिया फुके यांचे गंभीर आरोप: धमक्या, फसवणूक आणि अन्यायाचा आरोप

Parinay Fuke Nagpur News: भाजपचे आमदार परिणय फुके यांच्याकडून गुंडाकरवी मला दररोज धमकावले जात आहे. मी दररोज पोलीस ठाण्याच्या चकरा मारत आहे. मी याविरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही दाद मागितली होती. परंतु, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही मला ‘बघतो बघतो’ सांगण्यापलीकडे कोणतीही मदत केली नाही, असा गंभीर आरोप परियण फुके (Parinay Fuke) यांचे दिवंगत बंधू संकेत फुके यांच्या पत्नीने केला आहे. संकेत फुके यांच्या पत्नी प्रिया फुके बुधवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांच्यासोबत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे उपस्थित होत्या. या पत्रकार  परिषदेत प्रिया फुके यांची परिणय फुके यांच्यावर गंभीर आरोप केले. (Nagpur Crime news)

मी माझा लाडक्या भावांना मदत मागितली, पण मला मदत मिळाली नाही, माझा सोबत उभं राहायला कोणी उभं राहिलं नाही. संकेत फुके यांच्यासोबत माझं 2012 मध्ये लग्न झाले. लग्नानंतर संकेत फुके (Sanket Phuke) यांना आजार झाला होता. त्यांची किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रियाही झाली होती. माझी फसवणूक करुन हे लग्न झाले होते. माझ्या पतीला घेऊन आम्ही उपचारासाठी मुंबईला आलो होते. 2022 साली त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मी घरात माझ्या पतीचा पैशांचा कारभार, त्यांच्या मालमत्तेविषयी प्रश्न विचारले. तेव्हा ‘तू कोण आहेत?’, ‘तुला हे विचारण्याचा काय हक्क आहे?’ असे विचारत मला रात्री 10 वाजता घराबाहेर काढण्यात आले. त्यानंतर मला जीवे मारुन टाकण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. तू काही बोललीस तर तुझ्या कुटुंबाला मारुन टाकू, असे मला धमकावण्यात आले. मला दोन लहान मुलं आहेत. मी गेल्या दीड वर्षांपासून आईच्या घरी राहत आहे.

माझा हक्क मिळवण्यासाठी रोज पोलीस ठाण्यात चकरा मारत आहे. मला मारण्यासाठी अनेकदा गुंड येतात, त्यांच्या बॅगेत जड वस्तू असतात. आताही पत्रकार परिषदेला येतान माझ्या मागे दोन माणसं होती, ती कोण होती, हे मला माहिती नाही. माझ्यावर अॅट्रोसिटी, खंडणीचे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आजी-आजोबांनी कोर्टात केस करुन माझ्या मुलांची कस्टडी मागितली आहे. मुलांची आई जिवंत असताना ते कस्टडी कशी मागू शकतात? मी हक्क मागतेय माझा, मी कोणताही त्रास दिला नाही. मात्र, काहीतरी करुन आम्हाला दाबायचा प्रयत्न होत आहे, असा आरोप प्रिया फुके यांनी केला.

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनीही मदत केली नाही, प्रिया फुकेंचा आरोप

मी या सगळ्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही भेटले होते. त्यांना संपत्तीत आमचा हक्क असल्याची कागदपत्रं दिली होती. पण देवेंद्र फडणवीसांना आजपर्यंत कधीही हस्तक्षेप केला नाही. बघतो, बघतो, असे ते दरवेळी सांगत राहिले. मी त्यांना मेसेजही केले होते. मी त्यांना प्रत्यक्षात चारवेळा भेटून ही परिस्थिती सांगितली आहे. त्यांना सगळं माहिती असूनही ते काही करत नाहीत. मी महिला आयोगाकडे 2024 साली याविरोधात तक्रार केली होती. पण महिला आयोगानेही मला मदत केली नाही, असे प्रिया फुके यांनी म्हटले. मला दोन लहान मुलं आहेत. पोलीस ठाण्यात मला सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत बसवून ठेवले जाते, असाही आरोप त्यांनी केला.

मला धमक्या दिल्या जातात की, न्यायव्यवस्था, पोलीस आणि प्रशासन आमच्या खिशात आहे. तुझा आवाज कधीच लोकांपर्यंत पोहोचणार नाही. 20 वर्षे गेली तरी तुझी केस कोर्टात येणार नाही, असे अगतिक उद्गार प्रिया फुके यांनी पत्रकार परिषदेत काढले.

Sushma Andhare: पोलीस यंत्रणा प्रिया फुके यांच्याविरोधात: सुषमा अंधारे

पोलिसांची भूमिका ही प्रिया फुके यांच्याविरोधात राहिली आहे. प्रिया फुके यांनी आरोपाचे  पुरावे सादर करा, असा समन्स वारंवार पोलीस पाठवतात. त्यामुळे आम्ही पत्रकार परिषदेत सर्व पुरावे सादर केले. प्रिया फुके यांच्या विनयभंगाची तक्रार घेतली नाही. मात्र आरोपीच्या तक्रारीवरून अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला.  प्रिया फुके या लढाईत एकटी पडली होती. त्यामुळे आम्ही तिच्यासोबत उभे आहोत, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले.

Popular Categories

spot_imgspot_img