back to top
Thursday, April 24, 2025
9.7 C
London

मी माफी मागणार नाही… अजित पवार जे बोलले तेच मी बोललो; कुणाल कामराने काढले चिमटे

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणारं गाणं गायलं आहे. त्यामुळे शिंदे गटात संतापाची लाट पसरली आहे. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी या गाण्याचा निषेध म्हणून कुणाल कामराचा स्टुडिओ फोडला. त्यानंतर कामराच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आज दिवसभर या घटनेचे पडसाद उमटले होते. याच दरम्यान आपण पोलिसांना सहकार्य करण्यास तयार असल्याचं कुणाल कामरानने म्हटलं आहे. आता कुणालने एक स्टेटमेंट काढलं असून त्यात त्याने मी माफी मागणार नाही. तसेच मी बेडखाली लपून बसणाऱ्यांपैकीही नाही, असं सांगतानाच अजित पवार जे बोलले तेच मी बोललोय, असा दावा कुणाल कामराने केला आहे.

कुणाल कामराने चार पानांचं एक ट्विट केलं आहे. त्यातून त्याने आपली भूमिका जाहीर केली आहे. या ट्विटमधून कामराने सत्ताधाऱ्यांना आणि शिंदे गटाला उपरोधिक चिमटे काढले आहे. कुणालने त्याच्या खास शैलीतून अत्यंत मार्मिक शब्दात या पत्रातून चिमटे काढले आहेत.

तितकेच मूर्खपणाचे

हॅबिटॅट हा एक मनोरंजनाचा मंच आहे. सर्व प्रकारच्या जागांसाठीचं ते एक व्यासपीठ आहे. हॅबिटॅट (किंवा इतर कोणतेही स्थळ) माझ्या विनोदासाठी जबाबदार नाही. तसेच माझं बोलणं आणि कृती यावरही कोणतं नियंत्रण नाही. कोणताही राजकीय पक्षही नाही. एका विनोदी कलाकाराच्या शब्दावरून एखाद्या ठिकाणावर हल्ला करणे तितकेच मूर्खपणाचे आहे. तुम्हाला दिलेले बटर चिकन आवडले नाही म्हणून टोमॅटो घेऊन जाणारा ट्रक उलटवण्याचाच हा एक प्रकार आहे, असा चिमटा कुणालने काढला आहे.

धमकी देणाऱ्या “राजकीय नेत्यां”साठी…

बोलण्याचे आणि अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य केवळ शक्तिशाली आणि श्रीमंत लोकांची स्तुती करण्यासाठी नाही, आजची माध्यमं आपल्याला तसे भासवत असले तरी. सार्वजनिक जीवनातील बलाढ्य व्यक्तीवरील विनोद सहन करण्याची तुमची असमर्थता माझ्या हक्काचे स्वरूप बदलू शकत नाही. मला माहीत आहे त्यानुसार, आपल्या नेत्यांची आणि आपल्या राजकीय व्यवस्थेच्या तमाशाची थट्टा करणे कायद्याच्या विरोधात नाही. तरीही, माझ्याविरुद्ध केल्या गेलेल्या कोणत्याही कायदेशीर कारवाईसाठी मी पोलीस आणि न्यायालयांना सहकार्य करण्यास तयार आहे, असं त्याने म्हटलंय.

मग एल्फिस्टन पूल पाडण्याची गरज

पण ज्यांनी एका विनोदाने दुखावल्यावर तोडफोड करणे योग्य ठरवले, त्यांच्यावर कायदा योग्य आणि समान रितीने लागू होईल का? आणि आज हॅबिटॅट येथे पूर्वसूचना न देता आलेल्या आणि हॅबिटेटवर हातोडा मारणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करणार आहे का? असा सवाल त्याने केला आहे. पूर्व सूचना न देता हॅबिटॅटवर हातोडा टाकता? का तर मी तिथे कार्यक्रम करतो म्हणून. कदाचित माझ्या पुढील कार्यक्रमासाठी, मी एल्फिन्स्टन पूल किंवा मुंबईतील इतर कोणत्याही इमारतीची निवड करेन. मला वाटतं मग त्यालाही त्वरित पाडण्याची गरज आहे, असा चिमटा त्याने काढला आहे.

माझा नंबर लीक करणाऱ्यांसाठी…

अनोळखी कॉल माझ्या व्हॉईसमेलवर जातात. तिथे तुम्हाला तेच गाणं ऐकायला मिळतं आणि ते तुम्हाला मुळीच आवडत नाही. हे तुम्हाला आतापर्यंत समजलं असेल याची मला खात्री आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे. तसेच या तमाशाचे प्रामाणिकपणे वृत्तांकन करणाऱ्या माध्यमांनी लक्षात ठेवावं की भारतात पत्रकार स्वातंत्र्य 159 व्या क्रमांकावर आहे, असं तो म्हणाला.

माफी मागणार नाही

मी जे बोललो तेच अजित पवार (पहिले उपमुख्यमंत्री) यांनी एकनाथ शिंदे (दुसरे उपमुख्यमंत्री) यांच्याबद्दल बोलले होते. मला या जमावाची भीती वाटत नाही आणि मी हे शांत होण्याची वाट पाहत माझ्या पलंगाखाली लपणार नाही, असा टोलाही त्याने लगावला आहे.

Popular Categories

spot_imgspot_img