back to top
Tuesday, July 1, 2025
28.8 C
London

राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर, महाराष्ट्रात पुढील दोन दिवस जोरदार पाऊस कोसळणार, मे महिन्यात का पडत आहे पाऊस?

Maharashtra Rain Updates: महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मे महिन्यात जोरदार पाऊस सुरु आहे. मुंबई, पुण्यासह विदर्भ, मराठवाड्यात अनेक भागांत बुधवारी रात्री पाऊस झाला. गुरुवारी सकाळीसुद्धा पावसाळी वातावरण आहे. राज्यात पावसाचा जोर २४ मे पर्यंत कायम असणार आहे, असा अंदाज पुणे हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. पुढील दोन दिवसांमध्ये दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुणे जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ जालिंदर साब यांनी व्यक्त केली. अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

राज्यात यंदा मे महिन्यात उन्हाचे चटके बसण्याऐवजी पावसाळ्याचा अनुभव नागरिकांना येत आहे. मागील काही दिवसांपासून प्री-मान्सून पावसाला सुरुवात झाली आहे. सध्या हा पाऊस वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह होत आहे. वाऱ्याचा वेग ताशी ५० ते ६० किलोमीटरपर्यंत असण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये हा पाऊस जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा असण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.

मे महिन्यात का पडत आहे पाऊस

गोवा तसेच लगतच्या कर्नाटक किनारपट्टीला समांतर अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. यामुळे महाराष्ट्रात पाऊस पडत आहे. मे महिन्यात राज्यात इतका जोरदार पाऊस अत्यंत दुर्मिळ आहे. यंदा मान्सून अंदामान-निकोबारमध्ये लवकर सक्रीय झाला आहे. महाराष्ट्रात जूनच्या सुरुवातीलाच प्री-मान्सून दिसतो. पण यावर्षी वातावरणातील बदलांमुळे प्री-मान्सून पावसाला लवकर सुरुवात झाली आहे.

हे सुद्धा वाचा

विदर्भ, मराठवाड्यात पाऊस

विदर्भ, मराठवाड्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. गेल्या दोन दिवसांत अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. बुधवारी रात्री धारशिवमध्ये संततधार पाऊस बरसला. अमरावती शहरासह संपूर्ण जिल्हाभरात पावसाने बुधवारी रात्री दमदार बॅटिंग केली. या पावसामुळे अनेक भागांत पाणी साचल्यामुळे अमरावती महानगरपालिकेच्या पावसाळी कामांची पोलखोल झाली. पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. बीडमध्ये शेतकऱ्यांच्या शेतात कांदे सडले आहेत.

पुणे, मुंबईत पाऊस

मुंबई, पुण्यात बुधवारी रात्री पाऊस झाला. पुणे शहरात मुसळधार पावसामुळे ५४ ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने मदतकार्य करून रस्त्यात पडलेल्या फांद्या, झाडे हटवून रस्ते वाहतुकीस खुले करून दिले. मुंबई उपनगरातील कांदिवली, बोरिवली, मालाड, दहिसर, गोरेगाव आणि अंधेरी भागात मेघगर्जनेसह पाऊस झाला.

Popular Categories

spot_imgspot_img