Maharashtra Weather: राज्यातील बहुतांश भागात तापमानाचा भडका उडाला असल्याचे चित्र बघायला मिळात आहे. परिणामी उष्णतेमुळे नागरिकांची पूर्ती दैना झाली आहे. एरवी शहरातील कायम वर्दळीचे वाटणारे रस्तेही आता दुपारच्या वेळी सुनसान भासत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे मागील 2 दिवसांपासून विदर्भातील जिल्हे देशात सर्वात उष्ण तापमानात प्रथम असल्याचे पाहायला मिळत आहे. आज देखील चंद्रपूरात विदर्भातील सर्वाधिक 44.6 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची (Temperature Today) नोंद झाली आहे. तर पुढील 3 दिवस नागपूर,चंद्रपुर अकोला, अमरावती आणि वर्ध्यात तीव्र उष्णतेची लाट (Heat Wave) कायम असल्याचा इशारा नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने (IMD) दिला आहे. संभाव्य इशारा लक्ष्यात घेता योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, राज्याची उपराजधनी नागपुरातही तापमानाने नवे उच्चांक गाठले आहे. अशातच नागपूरच्या 33 चौकांवर दुपारी एक ते चार सिग्नल रेड ब्लिंकरवर वाहन चालकांना सिग्नल वर थांबायची गरज नाही. कारण उन्हापासून वाचवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष खबरदारी घेत ही योजना राबवली आहे.
दुपारी 1 ते संध्याकाळी 4 वाजे दरम्यान सिग्नल रेड ब्लिंकरवर
सध्या वाढलेलं तापमान पाहता वाहन चालकांना खास करून दुचाकी स्वारांना उष्माघातापासून वाचवण्यासाठी नागपूर पोलिसांनी वेगळीच शक्कल लढवली आहे. दुपारी 1 ते संध्याकाळी 4 वाजे दरम्यान नागपूरातील 33 चौकांवरील सिग्नल रेड ब्लिंकरवर ठेवण्यात येत आहे. त्यामुळे सिग्नल वर पोहोचल्यानंतर वाहन चालकांना काही सेकंद थांबून अवतीभवतीच्या ट्रॅफिकची स्थिती पाहून पुढे जाता येत आहे.

सिग्नलवर बराच वेळ थांबून राहिल्यामुळे दुचाकी स्वरांना उष्माघाताचा धोका बळावतो. त्यात वृद्ध महिला आणि लहान बालकांना जास्त त्रास होतो. हे पाहून नागपूर पोलिसांनी दुपारी एक त्याच्यात 33 चौकांवरील सिग्नल रेड ब्लिंकरवर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तापमान यापेक्षा जास्त वाढल्यास रेड ब्लिंकर वरील सिग्नलची संख्याही वाढवली जाईल, तसेच वेळेत बदल करून दुपारी 12 ते संध्याकाळी पाच अशी केली जाईल. अशी माहिती नागपूरचे वाहतूक पोलीस उप आयुक्त अर्चित चांडक यांनी दिली आहे.
विदर्भात 21 ते 23 एप्रिल दरम्यान उष्णतेच्या लाटेची शक्यता
दरम्यान, विदर्भात 21 ते 23 एप्रिल दरम्यान उष्णतेच्या लाटेची शक्यता असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. यात अकोला, चंद्रपूर, नागपूर, वर्धा आणि यवतमाळमध्ये तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यात आज आणि उद्या काही ठिकाणी तापमान उष्ण आणि दमट राहणार असल्याचे ही सांगण्यात आलंय. तर संध्याकाळी मराठवाड्यातील काही जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे