Yavatmal Crime News : यवतमाळच्या दिग्रस तालुक्यातील दत्तापुर जवळील कोलुरा जंगलात तीन दिवसांपूर्वी महिला व पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळुन आला होता. या घटनेनं सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. दरम्यान आता पोलिसांनी केलेल्या तपासात त्या दोन्ही मृतकांची ओळख पटली असून या प्रकरणामागचे कारण ही पुढे आले आहे. प्रेम प्रकरणातून त्यांची हत्या झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या प्रकरणी 4 आरोपी पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सध्या सुरू आहे.
प्रेमप्रकरणातून हत्या, चार आरोपींना बेड्या
पुढे आलेल्या माहितीनुसार, वर्षा धनराज गिरे (रा. उमरी बु. ता. मानोरा जि. वाशिम), आकाश विलास बल्हाळ (रा. वाई गोस्था ता. मानोरा जि. वाशिम) अशी मृतकांची नावे आहे. मृतक वर्षा व आकाश हे उस तोडणीचे काम करण्यासाठी जात होते. त्या ठिकाणी त्या दोघांचे प्रेमसंबंध जुळले होते. 29 मार्च रोजी ते दोघे घरुन पळून गेले होते. दरम्यान, 7 एप्रिल रोजी दिग्रस वनविभाग क्षेत्रातील दत्तापुर जवळील कोलुरा जंगलात त्यांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळले होते. त्यानंतर घटनेचे माहिती पोलिसांना दिली असता पोलीस पथकाने घटनास्थळ गाठत तपास सुरू केला. दरम्यान या प्रकरणी दोन्ही मृतकाच्या कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईकांची कसुन चौकशी सुरु केली असल्याची माहिती पोलीस दिग्रस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे यांनी दिली.
स्विमिंग पुलमध्ये बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरातील शासकीय क्रीडा संकुलात असलेल्या स्विमिंग पूलमध्ये काल(10 एप्रिल) सायंकाळी चिखली शहरातीलच रामसिंग चुनीवाले आयुर्वेदिक महाविद्यालयात द्वितीय वर्षाला बी ए एम एस शिक्षण घेणारे दोन विद्यार्थी बुडून मरण पावले. विवेक वायडे ( गेवराई, जी.बीड) व विवेक वायले ( तेल्हारा जि.अकोला) अशी मृतक विद्यार्थ्यांची नावे असून ते काल सायंकाळी शासकीय क्रीडा संकुलात सुरू असलेल्या रेनबो स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी गेले होते.

मात्र अचानक ते बुडून मरण पावले. तात्काळ उपस्थित त्यांनी त्यांना चिखली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. पोलिसांनी संबंधित घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास चिखली शहर पोलीस करत आहेत सध्या दोघांचेही मृतदेह चिखली ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत.