back to top
Sunday, September 14, 2025
15.5 C
London

Wardha : मंत्रतंत्राद्वारे गुडघेदुखी बरी करण्याचा दावा करून भोंदू बाबाने ५० हजार रुपयांची फसवणूक

Wardha Crime : कुणीतरी जादुटोणा करून तुमचा पाय खराब केलाय, आपल्या अतेंद्रीय शक्तीने पायाचा आजार दुरूस्त करून देतो, असा दावा वर्ध्यात भोंदूबाबाकडून केला जायचा. हा दावा करणाऱ्या भोंदूबाबाने वर्ध्यातील (Wardha Crime News) एका व्यक्तीची तब्बल 50 हजार रुपयांनी फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. नळीच्या साहाय्याने शरीरातील अशुद्ध रक्त तोंडाने ओढण्याचा ढोंगी प्रयोग करत ही फसवणूक केली गेली आहे. वर्धा पोलिसांनी (Wardha Police) याप्रकरणी तिघांना अटक केली. तर नागरिकांनी अशा भोंदू बाबांपासून सावध राहण्याचे आवाहन देखील पोलिसांनी केले आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, वर्ध्याच्या सुदामपुरी येथील 65 वर्षीय प्रकाश शिंदे नामक व्यक्तीला दोन वर्षांपासून उजव्या पायाच्या गुडघ्याचा त्रास असल्याने सेवाग्राम, नागपूर, यवतमाळ येथे त्यांनी उपचार केले. पण, आराम मिळाला नाही. दरम्यान घराजवळ आलेल्या अनोळखी इसमाने तुमच्या पायाची गुडघेदुखी आपल्याला तपस्या करून मिळालेल्या अतेंद्रीय शक्तीने बरे करुन देतो, असा दावा केला. उपचार करण्यास नकार दिल्यावर देखील तो इसम घरात आला आणि उपचार सुरू केला. पाणी, मंत्राचा कागद, प्लास्टिक नळी यातून त्याने उपचार सुरू केले. ढोंग करीत रबरी नळीने शरीरातून काढलेल्या अशुद्ध रक्ताच्या प्रत्येक घोटाचा खर्च अडीच हजार रुपये असल्याचे सांगून सत्तावीस घोट काढण्यात आले. उपचारानंतर तब्बल पन्नास हजार रुपये सदर व्यक्तीकडून उकळण्यात आले. पण उपचारानंतर शिंदे यांना आपण फसलो असल्याचे लक्षात आले.

‘असे’ फुटले भोंदू टोळीचे बिंग 

यानंतर दुसऱ्यांदा पुन्हा तशाच प्रकारचा व्यक्ती त्यांच्या घराजवळ आला. त्याने त्याच पद्धतीने प्रयोग करीत उपचार करण्याचा दावा केला. त्याच्या सोबत काही महिला देखील होत्या. यापूर्वीच फसवणूक झालेल्या प्रकाश शिंदे यांनी त्याला घरात घेत उपचाराची तयारी दाखवली आणि लागलीच पोलिसांना फोन करून बोलावून घेतले. फोनवर नातेवाईकही एकत्र झाले. पोलीस आणि जमलेल्या नातेवाईकांपुढे या अंतेद्रीय शक्ती असणाऱ्या भोंदू टोळीचे बिंग फुटले. पूर्वी पन्नास हजार रुपये घेऊन पसार झालेल्या भोंदूला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून विदेशी चलनाच्या काही नोटा, बनावट औषधी, वेगवेगळ्या तारखांचे आधारकार्ड जप्त करण्यात आले आहे. सलाउद्दीन अब्दुल हफीज, अजीनन अब्दुल हाफिस दोघेही (रा. बुंदी राजस्थान), सायरा बानो शरीफ (रा. बुंदी राजस्थान) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच इतर अनोळखी व्यक्तीविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Popular Categories

spot_imgspot_img