अकोला : राज्यात एकीकडे पावसाने थैमान घातले असून शेतकऱ्यांना (Farmers) नुकसान सहन करावे लागत आहे. मान्सूनपूर्वच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने काही ठिकाणी वादळीवाऱ्यासह वीज कोसळून नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. दुसरीकडे निवडणुकांपूर्वी शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन देणाऱ्या नेत्यांनी पाठ फिरवल्याने शेतकरी चिंतातूर आहे. त्यातच, अकोल्यात (Akola) एका अल्पभूधारक शेतकऱ्याने केवळ 20 हजार रुपयांच्या कर्जापोटी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. देवानंद सुखदेव इंगळे असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून शेतातीलच आंब्याच्या झाडाला गळफास घेत त्यांनी आपलं जीवन संपवलं. अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातल्या निमकर्दा येथे देवानंद इंगळे राहात होते. मृत इंगळे यांच्याकडे जवळपास मुद्दल आणि व्याजाची रक्कम मिळून 20 हजार रुपयापेक्षा अधिक कर्ज होते.
अतिवृष्टी व कर्जमुक्ती होत नसल्याच्या चिंतेमुळेच या शेतकऱ्यानं आत्महत्या केली असल्याचं कुटुंबीयांनी म्हटलं आहे. इंगळे यांच्याकडे एकर शेती होती, नापिकी आणि कर्जबाजारीला कंटाळून इंगळे यांनी आत्महत्यासारखं टोकाचा पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. याप्रकरणी उरळ पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आलीय. दरम्यान, सेवा सहकारी सोयायटीच्या सचिवांनी गाव तलाठ्यांना पत्र लिहून या कर्जाबाबतची माहिती दिली आहे. देवानंद इंगळे या शेतकऱ्याने आत्महत्या केली असून त्यांच्याकडे सन 2022 चे पीकर्ज रुपये 15000 आणि 5400 रुपये व्याज अशी एकूण 20,450 रुपयांचे कर्ज असल्याची नमूद केले आहे. मयत सभासदाच्या कर्जाची माहिती देण्यात येत असल्याचे सांगत सोसायटी सचिवांनी हे पत्र तलाठी महोदयांना दिले आहे.
महाविस्तार AI अॅपचे लोकार्पण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे ‘राज्यस्तरीय खरीप हंगाम नियोजन बैठकी’दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या ‘डिजिटल भारत, आत्मनिर्भर महाराष्ट्र’ संकल्पनेला अनुसरुन कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने शासन अधिक सक्षम, लोकाभिमुख आणि पारदर्शक करण्याच्या दृष्टीने कृषी विभागाने विकसित केलेल्या ‘महाविस्तार – AI अॅप’चे लोकार्पण केले. शेतकऱ्यांना शास्त्रशुद्ध व रिअल-टाइम कृषी विषयक सल्ला देणाऱ्या ‘महाविस्तार – AI ॲप’ची माहिती सांगणारी AV याप्रसंगी सादर करण्यात आली.
