back to top
Saturday, September 13, 2025
11.7 C
London

Devendra Fadnavis On Kunal Kamra Eknath Shinde Comment

 

Devendra Fadnavis On Kunal Kamra Eknath Shinde Comment: मुख्यमंत्री तसेच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल असं सांगितलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसंदर्भात वादग्रस्त गाणं तयार केल्याने कुणाल कामराविरोधात शिवसैनिक आक्रमक झालेले असतानाच फडणवीसांनी यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पत्रकारांशी बोलताना फडणवीसांनी दुसऱ्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारं स्वातंत्र्य मान्य करता येणार नाही, असं कामराने केलेल्या टीकेबद्दल म्हटलं आहे.

खालच्या दर्जाची कॉमेडी​…

पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी कामराने शिंदेंवर केलेल्या वादग्रस्त गाण्याबद्दल भाष्य केलं. “स्टॅण्डअप कॉमेडी करण्याचा कोणालाही अधिकार आहे. पण स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कोणाला नाही. कोणाकडे स्वर्गीय हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची विरासत कोणाकडे गेली हे जनतेनं ठरवलं आहे. अशाप्रकारे खालच्या दर्जाची कॉमेडी करुन अनादर करण्याचा कोणाचाही अधिकार नाही. राज्याचे माजी मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री राज्याचे वरिष्ठ नेते ज्यांच्याबद्दल राज्याच्या जनतेमध्ये आदर आहे. त्यांच्याबद्दल अशाप्रकारचं व्यंग करणं अत्यंत चुकीचं आहे,” असं फडणवीस म्हणाले आहेत.

माफी मागितली पाहिजे

“तुम्ही जरुर कॉमेडी करा, व्यंग करा पण अपमानित करण्याचं काम कोणी केलं तर हे सहन केलं जाणार नाही. हे अतिशय चुकीचं आहे. कामरांनी माफी मागितली पाहिजे. ते जे संविधानाचं पुस्तक दाखवत आहेत. त्यांनी जर संविधान वाचलं असेल, त्यांना संविधानाची माहिती असेल तर संविधानानेच सांगितलेलं आहे की स्वातंत्र्याचा स्वैराचार करता येणार नाही. दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण करता येणार नाही. म्हणून आमची मागणी आहे की त्यांनी या ठिकाणी माफी मागितली पाहिजे,” असं फडणवीस म्हणाले.

गद्दार म्हणू शकत नाही

“बाळासाहेबांचा वारसा शिंदेंकडे असल्यावर जनतेनं शिक्कामोर्तब केलं आहे. तर कोणी कॉमेडियन उभं राहून त्यांना अशाप्रकारे गद्दार म्हणू शकत नाही. ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांबरोबर गद्दारी केली त्यांना घरी पाठवण्याचं काम जनतेनं केलं आहे,” असा टोला फडणवीसांनी लागवला आहे. “खरं म्हणजे कामराला हे माहिती पाहिजे की महाराष्ट्राच्या जनतेनं 2024 मध्ये कोण गद्दार आहे आणि कोण खुद्दार आहे हे दाखवून दिलेलं आहे,” असंही फडणवीस म्हणाले.

कायदेशीर कारवाईचा इशारा

“मी असं मानतो की कॉमेडी करण्याचा अधिकार आहे. आमच्यावरही व्यंग करा यात काही वाईट वाटणार नाही. मात्र मुद्दाम एवढ्या मोठ्या नेत्यांना बदनाम करण्याचं कोणी काम करत असेल तर ते सहन केलं जाणार नाही. त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल,” असंही गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे.

Popular Categories

spot_imgspot_img