गडचिरोली : गडचिरोली पोलिसांच्या सी-60 जवानांनी मुसळधार पावसामध्ये भामरागडच्या घनदाट जंगलात अभियान राबवून 4 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. या चारही नक्षलवाद्यांवर तब्बल 14 लाखांचे बक्षीस होते, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. घटनास्थळावरुन एक एसएलआर रायफल, दोन 303 रायफल, आणि एक भरमार बंदूक असे चार बंदूक जप्त करण्यात आले आहेत. आताही घटनास्थळावर सर्चिंग ऑपरेशन सुरू असून पोलिसांनी नक्षलविरोधी अभियान तीव्र केले आहे.
तास चाललेल्या चकमकीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा
गोपनीय माहितीच्या आधारे गडचिरोली पोलिसांच्या सी- 60 च्या 12 तुकड्या आणि सीआरपीएफ 113 बटालियनची 1 तुकडी भामरागड तालुक्यातील गवंडे आणि नेलगुंडा परिसरातील इंद्रावती नदीच्या काठावर नक्षलविरोधी अभियान राबवत होते. घनदाट जंगल आणि पावसाचा सामना करत असताना शुक्रवारी सकाळी 7 वाजताच्या सुमारास दबा धरुन बसलेल्या नक्षलवाद्यांसोबत चकमक उडाली. जवळपास 3 तास चाललेल्या चकमकीत पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी जंगलात पसार झाले. पोलिसांनी घटनास्थळावर सर्चिंग ऑपरेशन राबवले असता चार नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळले. यामध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे.
सर्वांची ओळख पटली असून सन्नु मासा पुंगाटी, वय 35 वर्षे, रा. कवंडे, अशोक ऊर्फ सुरेश पोरीया वड्डे, वय 38 वर्षे, रा. कवंडे, करुणा ऊर्फ ममीता ऊर्फ तुनी पांडू वरसे, वय 21 वर्षे, रा. गोंगवाडा आणि विज्यो ऊर्फ विज्यो होयामी, वय 25 वर्षे, रा. पोडीया, असे मृतक नक्षलवाद्यांची नावे आहेत.
