गडचिरोली: जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील जयनगर जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षिकेच्या प्रेमप्रकरणाची गंभीर दखल घेत शाळा व्यवस्थापन समिती आणि गावकऱ्यांनी शाळेलाच कुलूप ठोकले आहे. मुख्याध्यापक जितेंद्र मंडळ आणि शिक्षिका कोमल साखरे शाळेतच विद्यार्थ्यांपुढे अश्लील चाळे करतात आणि बघणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण करतात. या घटनेच्या निषेधार्थ म्हणून दोघांनाही सेवेतून बडतर्फ होईपर्यंत शाळेचे कुलूप उघडणार नाही, असा इशारा शाळा व्यवस्थापन समितीने दिला आहे. मुख्याध्यापक आणि शिक्षिका शाळेत नेहमी अश्लील चाळे करीत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा आरोप, शाळा व्यवस्थापन समिती आणि गावकऱ्यांनी केला आहे. याबाबत आता स्थानिक प्रशासन आणि शिक्षण विभाग काय कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या पालकांनी संताप व्यक्त केला आहे.