Maharashtra Weather : राज्यातील तापमानात (Temperature) वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राज्यातील बहुतांश भागात तापमानाचा पारा 35 ते 40 अंशाच्या घरात गेला आहे. तर काही ठिकाणी 42 ते 43 अंशावर तापमानाचा पारा गेला आहे. त्यामुळं नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार (IMD), अकोल्यात (Akola) आज राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झालीय. अकोल्यात आज तापमानाचा पारा 44.2 अंशांवर पोहोचलाय. तर चंद्रपूरमध्ये (Chandrapur ) 43.6 अंश तापमानाची नोंद झाली आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती तापमानाची नोंद?
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार अकोल्यात आज या मोसमतलं सर्वाधिक तापमान नोंदवण्यात आलं आहे. अकोल्याचा पारा आज 44.2 अंशांवर गेला आहे. काल अकोल्याचं तापमान 43.2 अंश सेल्सिअस होतं. दरम्यान जिल्हा प्रशासनाने नागरिकांना उन्हापासून संरक्षण करण्यासाठी उपाययोजना सुचविल्या आहेत. तर चंद्रपूर जिल्ह्यात देखील तापमानात मोठी वाढ झाली आहे. आज चंद्रपुरात तापमानाचा 43.6 अंशावर गेला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आज या मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. तसेच हिंगोली जिल्ह्यात देखील तापमानाचा पारा चांगलाच वाढल्याचे दिसत आहे. हिंगोलीत तापमानाचा पारा 41 अंशावर पोहोचला आहे. परभणी शहरासह जिल्ह्यात मागच्या 2 दिवसांपासून तापमान चांगलेच वाढले आहे. काल 40 तर आज थेट 41.03 अंशांवर तापमान गेले आहे. सलग दोन दिवस तापमान चाळीशी पार गेल्याने सर्वत्र प्रचंड उकाडा जाणवत आहे.ज्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांबरोबरच बाजारपेठेत ही दुपारच्या सुमारास शुकशुकाट पाहायला मिळत आहे.घरबाहेर पडलेले परभणीकर डोक्याला रुमाल,टोपी घालून बाहेर पडत आहेत.
दरम्यान, सध्या अकोल्यात सूर्य अक्षरशः आग ओकतोय. आज अकोल्यात या मोसमतला सर्वाधिक 44.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आलं आहे. काल अकोला हे महाराष्ट्रातला सर्वाधिक उष्ण शहर होतं. कालचा अकोल्याचा पारा 43.2 अंशावर होता. या वाढत्या तापमानाचा परिणाम अकोल्याच्या जनजीवनावर झालाय. दुपारच्या वेळी अकोल्यातील रस्ते निर्मनुष्य होताना दिसत आहेत.

गेल्या पाच दिवसातील अकोल्यातील तापमान
तारीख तापमान
03 एप्रिल 37.1
04 एप्रिल 39.0
05 एप्रिल 41.7
06 एप्रिल 43.2
07 एप्रिल 44.2
उन्हापासून संरक्षण करण्यासाठी काय काळजी घ्यावी?
दरम्यान, अकोला जिल्हा प्रशासनाने वाढत्या उन्हामुळे जिल्ह्यातील नागरिकांना स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन केलं आहे.
उन्हात अतिशय महत्त्वाचे काम असले तरच घराबाहेर पडा.
घराबाहेर पडताना डोक्याला सुती दुपट्टा किंवा उपरणं बांधा.
यासोबतच उन्हापासून डोळ्याचे संरक्षण करण्यासाठी सन गॉगल्स घाला.
बाहेर निघताना सोबत थंड पाण्याची बाटली ठेवा.
भरपूर पाणी प्या. यासोबतच ताक, नींबूपाणी आणि शीतपेय यांचा अधिकाधिक वापर करा.