back to top
Wednesday, June 18, 2025
25.8 C
London

Nagpur : नागपूर बोगस शिक्षक घोटाळा: विभागीय शिक्षण मंडळाच्या सचिव वैशाली जामदार अटके

Nagpur Bogus Teacher Scam नागपूर :  राज्यभरात गाजत असलेल्या नागपूर जिल्ह्यातील बोगस शालार्थ आयडी आणि बोगस शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी नवी माहिती समोर आली आहे. या प्रकरणी आता छत्रपती संभाजीनगर येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळाच्या सचिव वैशाली जामदार यांना  अटक करण्यात आलीय. नागपूर पोलिसांच्या एसआयटीने छत्रपती संभाजीनगर इथून त्याना ही अटक करण्यात आली असून त्यांना नागपुरात आणण्यात आले आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची व्याप्ती दिवसागणिक वाढत असल्याचे बोललं जात आहे. 

बनावट कागदपत्राचे आधारे अपात्र शिक्षकांना पदोन्नती देण्यास मान्यता

पुढे आलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय शिक्षण मंडळ सचिव पदावर कार्यरत असलेल्या वैशाली जामदार या उल्हास नरड यांच्या पूर्वी नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालक होत्या. तपासा दरम्यान त्यांच्या कार्यकाळात नागपूर शिक्षण उपसंचालक कार्यालयाव्दारे बनावट कागदपत्राचे आधारे अपात्र शिक्षकांना पदोन्नती देण्यास मान्यता देण्याचा ठराव करण्यात आला आणि फेरबदल करुन शासनाची फसवणूक करण्यात आल्याचे निदर्शनास आले. यावरून या घोटाळा प्रकरणी नियुक्त विशेष तपास पथकाने त्यांना हजर राहण्याची नोटीस दिली होती. दरम्यान, विशेष तपास पथकाने (एसआयटी) गुरुवारी छत्रपती संभाजीनगर येथे त्यांच्या निवासस्थान येथून त्याना ताब्यात घेतले होते. यानंतर कोर्टातून ट्रान्झिट रिमांड घेऊन त्यांना नागपूर येथे आणण्यात आले आहे.

नेमकं प्रकरण काय?

नागपूरसह राज्यात गाजत असलेल्या शिक्षण विभागातील 580 शिक्षक भरती घोटाळ्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली होती. नागपूर जिल्ह्यात खासगी प्राथमिक शाळांमध्ये एक दोन नव्हे तर तब्बल 580 शिक्षकांची बोगस पद्धतीने नियुक्त करण्यात आल्याचा काळाबाजार उघड झाला आहे. दरम्यान,  या घोटाळ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गंभीर दखल घेण्यात आली असून प्रशासनाला कारवाईचे सक्त आदेश देण्यात आलेले आहे. बनावट शालार्थ आयडीद्वारे शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करुन सरकराला कोट्यवधीची चुना लावण्यात आल्याचे उजेडात आले आहे.

बोगस शिक्षकांशी संबंधित शालार्थ आयडी म्हणजेच त्यांचा वेतन देण्यासाठीच्या संगणिकृत प्रक्रिये संदर्भात अनेक डिव्हाईस (डेस्कटॉप कम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल फोन) वेगवेगळ्या लोकेशन्सवरून वेगवेगळ्या आयपी ऍड्रेसद्वारे वापरले गेल्याचे दिसून येत आहे. तर मोठ्या संख्येने वेगवेगळे लोकेशन्स किंवा आयपी ऍड्रेस किंवा डिवाइस वापरले गेल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे. त्यामुळे सायबर सेल समोर या घोटाळ्याचा तपास करणं एक मोठं आव्हान होऊन बसले आहे. या प्रकरणी एकट्या नागपूर विभागात झालेल्या 580 शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांची चौकशी सुरु करण्यात आली आहे. तर प्रत्येक बोगस नियुक्तीसाठी 20 ते 35 लाख रुपये घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे बोगस शिक्षकांच्या बँक खात्यात पगार जमा झाल्याच्या नोंदीही आता पोलीस तपासणार असल्याची माहिती आहे.

Popular Categories

spot_imgspot_img