Nagpur Temperature Heat Wave : वाढलेले तापमान पाहता विदर्भातील शाळांच्या परीक्षा लवकर घेण्यासाठी संबंधित जिल्ह्यातील शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाच्या वरिष्ठांची परवानगी घेऊन वेळापत्रक ठरवावे, असे निर्देश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहे. संपूर्ण राज्यात एकाच दिवशी एकाच वेळेस परीक्षा घेण्यासंदर्भात शिक्षण विभागाने या वर्षी निर्णय घेतला होता. त्यामुळे आजवर एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत विदर्भातील शाळांच्या परीक्षा संपत असताना, यावर्षी शिक्षण विभागाच्या निर्णयामुळे विदर्भातील शाळांच्या परीक्षा एप्रिल अखेरपर्यंत लांबणार होत्या.
मात्र विदर्भातील तीव्र उन आणि वाढलेलं तापमान पाहता शिक्षण विभागाच्या संपूर्ण राज्यात एकाच दिवशी एकाच वेळी परीक्षा घेण्याच्या निर्णयाला विदर्भातील शाळा व्यवस्थापनांनी तीव्र विरोध दर्शविला होता. त्यासाठी शिक्षण मंत्र्यांना पत्र ही पाठवण्यात आले होते. सोबतच उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका ही दाखल करण्यात आली होती.
शाळांसाठी परीक्षेच्या वेळापत्रकात आवश्यक बदल करावे- न्यायालय
अशातच काल (7 एप्रिल ) संध्याकाळी उशिरा या संदर्भात न्यायालयात सुनावणी झाली असून न्यायालयाने विदर्भातील सर्व जिल्ह्यातील शिक्षण अधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाची परवानगी घेऊन विदर्भातील शाळांसाठी परीक्षेच्या वेळापत्रकात आवश्यक बदल करावे, असे निर्देश दिले आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळांने न्यायालयाच्या निर्देशांचे स्वागत करत विदर्भातील शिक्षण अधिकाऱ्यांनी त्वरित निर्णय करून विदर्भातील शाळांच्या परीक्षेच्या वेळापत्रकात सुधारणा करावी, अशी मागणी केली आहे. विदर्भातील तीव्र उन आणि वाढलेले तापमान लक्षात घेता 15 एप्रिल च्या पूर्वी विदर्भातील शाळांच्या परीक्षा घेण्यात याव्या, अशी मागणी ही महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने केली आहे. अशी माहिती या प्रकरणातील याचिकेकर्ते तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे महासचिव रवींद्र फडणवीस यांनी दिली आहे.

एप्रिल ते जून या काळात उष्णतेची लाट
विदर्भातील बहुतांश जिल्ह्यातील तापमानाचा पारा हा 44 अंश सेल्सिअसच्या वर गेला असून पश्चिम विदर्भातील जिल्ह्यात पुढच्या दोन दिवसात उष्णतेची लाट (Heat Wave) येण्याची शक्यता नागपूर वेधशाळेने (IMD) वर्तवली आहे. परिणामी संभाव्य इशारा लक्ष्यात घेता योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, IMD चे प्रमुख मृत्युंजय महापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम आणि पूर्व भारतातील काही भाग वगळता देशातील बहुतांश भागात कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त असेल. या दोन्ही भागात तापमान सामान्य राहण्याची शक्यता आहे. एप्रिल ते जून या काळात उत्तर आणि पूर्व भारत, मध्य भारत आणि उत्तर-पश्चिम भारताच्या मैदानी भागात उष्णतेची लाट सामान्यपेक्षा दोन ते चार दिवस जास्त राहण्याची शक्यता आहे.