back to top
Thursday, July 31, 2025
17.8 C
London

Nashik : नाशिकमध्ये आंतरजातीय विवाहातून सूनेवर अत्याचार; जबरदस्ती गर्भपाताचा धक्कादायक प्रकार उघड

नाशिक – नाशिकमध्ये एक अत्यंत संतापजनक आणि मानवतेला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. राज्यात वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच, नाशिकमधून समोर आलेल्या या घटनेमुळे पुन्हा एकदा आंतरजातीय विवाहानंतर महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

या घटनेत एका महिलेचा जबरदस्तीने गर्भपात केल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे. पीडित महिलेने सात वर्षांपूर्वी भूपेश पाठक या तरुणासोबत वैदिक पद्धतीने आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. मात्र हा विवाह फारसा कुणाला माहिती नव्हता आणि विवाहानंतरही दोघे आपापल्या घरीच राहत होते.

लग्नाच्या काही काळानंतर, त्यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले आणि पीडित महिला गरोदर राहिली. याची माहिती पतीच्या कुटुंबीयांना मिळाल्यानंतर तिच्यावर मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाला. विशेष म्हणजे, पीडितेच्या पतीची आई सुचित्रा पाठक ही नर्स असून, तिच्यावर घरातच जबरदस्तीने गर्भपात घडवून आणल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

सासूने तिला तीन गर्भपाताच्या गोळ्या दिल्या आणि सलाइन लावली, असे पीडित महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. एवढेच नव्हे तर, त्यानंतरही पतीने तिला स्वीकारण्यास नकार दिला. पीडितेचा आरोप आहे की, सासू, सासरे, नणंद आणि पती – चौघांनीही सातत्याने तिचा छळ केला आणि जातीवाचक शिवीगाळ करत तिला मानसिक त्रास दिला.

या प्रकरणी पीडित महिलेने नाशिकच्या आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलीसांनी सुचित्रा पाठक, प्रवीण पाठक, स्मिता पाठक आणि भूपेश पाठक यांच्याविरोधात गंभीर गुन्हा नोंदवला आहे.

ही घटना नाशिकसह संपूर्ण राज्याला हादरवून टाकणारी असून, आंतरजातीय विवाह करणाऱ्या महिलांवरील अत्याचाराचा हा आणखी एक काळा अध्याय ठरतो. पोलिसांची चौकशी सुरू असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सामाजिक संघटनांकडून केली जात आहे.

Popular Categories

spot_imgspot_img