उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते तथा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचे सुपुत्र सिद्धांत शिरसाट यांच्यावर एका विवाहित महिलेने शारीरिक व मानसिक छळाचे गंभीर आरोप केलेत. या प्रकरणी पीडितेने सिद्धांत यांना कायदेशीर
दरम्यान, दिव्य मराठी डिजिटलने या प्रकरणी सिद्धांत शिरसाट यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या नोटीशीची आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचे सांगत आपले हात वर केले.
पीडित महिलेचे वकील चंद्रकांत ठोंबरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धांत शिरसाट यांनी चेबूर येथील त्यांच्या वडिलांच्या नावावर असलेल्या फ्लॅटमध्ये पीडित महिलेशी लग्न केले. दोन वर्षे ते चांगले राहिले. पण नंतर तिसऱ्याच मुलीशी त्यांचे अफेअर सुरू झाले. यामुळे त्यांनी पीडितेकडे दुर्लक्ष करत तिचा मानसिक छळ सुरू केला. तिने कुठे तक्रार दाखल करू नये म्हणून सिद्धांत शिरसाटने स्वत:च्या डोक्याला बंदूक लावत तिला धमकावले.

सिद्धांत शिरसाटने पीडितेला छत्रपती संभाजीनगरलाही येऊ दिले नाही. तू तिकडे आलीस तर तुझे तगडे तोडू अशी धमकी त्यांनी तिला दिली. त्यामुळे आम्ही त्यांना यासंबंधी नोटीस पाठवून पीडितेला 7 दिवसांच्या आत नांदण्यास घेऊन जाण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी पीडितेला नांदण्यास नेले नाही तर आम्ही महिला अत्याचार प्रतिबंधक काद्यांतर्गत त्यांच्यावर 3 केस दाखल करणार आहोत.
आता पाहू काय आहे नेमके प्रकरण?
छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचे सुपुत्र सिद्धांत शिरसाट यांच्यावर एका विवाहित महिलेने गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. सदर महिलेने सिद्धोांत यांना कायदेशीर नोटीस बजावून त्यांच्यावर मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप केला आहे.
पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, त्यांची 2018 मध्ये सोशल मीडियावरून सिद्धांत शिरसाट यांच्याशी ओळख झाली. काही दिवसांतच हे नाते चेंबूर येथील एका फ्लॅटमध्ये शारीरिक संबंधांपर्यंत पोहोचले. या संबंधानंतर सिद्धांतने आत्महत्येच्या धमक्या देत तिला भावनिक ब्लॅकमेल केले. त्याचबरोबर लग्नासाठी दबाव आणला. महिलेच्या म्हणण्यानुसार, सिद्धांतच्या सततच्या भावनिक आश्वासनांवर विश्वास ठेवून तिने त्याच्याशी विवाह केला. मात्र या नात्याचा शेवटही वेदनादायक ठरला. महिलेला गर्भधारणाही झाली होती, पण सिद्धांतने जबरदस्तीने तिचा गर्भपात करवून घेतल्याचा उल्लेख तिने नोटीसीमध्ये केला आहे. संजय शिरसाट हे राज्याचे सत्ताधारी शिवसेनेचे मंत्री आहेत. त्यामुळे पोलिसांनी अद्याप या प्रकरणी कोणतीही कारवाई न करता हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे.
फडणवीस शिरसाटांचा राजीनामा घेण्याची तत्परता दाखवणार का? -सुषमा अंधारे
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी संजय शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. लोकप्रतिनिधीकडून अशा प्रकारे गुन्हेगारीला प्रोत्साहन दिले जात असेल किंवा लोकप्रतिनिधी अशा प्रकारे सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर लेकीबाळीवर हात टाकत असतील तर ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणी योग्य तो निर्णय घ्यायचा आहे. भाजपने संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यासाठी जी तत्परता दाखवली होती. ती शिरसाट यांच्या राजीनाम्यासाठी दाखवली जाणार का? आपल्या बापाच्या सत्तेचा गैरफायदा घेत हे प्रकरण दाबण्याचा आणि त्या महिलेवर अन्याय करण्याची जी ताकद आहे, ती सत्तेतून आली आहे. त्यामुळे फडणवीस ही सत्ता काढून घेण्याची हिंमत दाखवणार का? हा खरा प्रश्न आहे, असे अंधारे यांनी म्हटले आहे. मी पीडितेची भेट घेऊन हा मुद्दा लावून धरणार असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या.
कठोर कारवाई होणे गरजेचे- अंबादास दानवे
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे. एका महिलेवर अन्याय होत असेल आणि तिने तशी तक्रार केली असेल, तर त्यावर रीतसर कारवाई होणे आवश्यक आहे. राजकीय दबावापोटी तक्रारीकडे दुर्लक्ष करून गुन्हा न दाखल करून घेणे हे चुकीचे आहे. त्यामुळे संबंधितावर कठोर कारवाई करण्यात यावी, असे त्यांनी म्हटले आहे.
खाली सिद्धांत शिरसाट यांना मिळालेली नोटीस वाचा जशीस तशी
माझे पक्षकार जान्हव्ही सिरसाठ व आपली ओळख मोबाईल, व्हॉटसअप, फेसबुक व इंस्टाग्रामद्वारे सन 2018 मध्ये झाली, त्यानंतर आपल्या संमंतीवर व आपल्या प्रतिसादामुळे वारंवार मोबाईल संपर्क व व्हॉटसअप, फेसबुक व इंस्टाग्राम अॅप वर मोबाईल होत गेला. असे की, माझे पक्षकार व आपली प्रत्यक्ष भेट आपल्या सिंधी सोसायटी, चेंबूर मुंबई येथील Flat वर झाली व त्यांनतर तुमच्या दोघांमध्ये वारंवार भेटी झाल्या दरम्यान तुमच्या दोघांमध्ये शारिरिक संबंध प्रस्तापित झाले व आपण स्वतःमाझे पक्षकारास लग्न करण्यासाठी हातावर, शरीरावर ब्लेडने जखमा करुन लग्नासाठी इमोशनली ब्लॅकमेल करीत असत. दरम्यान आपण माझे पक्षकारास तु माझया सोबत आताच लग्न कर नाहीतर मी आत्महत्या करुन घेईन तसेच हातावर ब्लेडने जखमाकरून त्याचे फोटो माझे पक्षकाराचे मोबाईल व इंस्टाग्रामवर आपण शेअर केले आहे, तसेच आपण स्वत;च्या डोक्याला पिस्तुल लावून मी गोळी मारुन घेईन व जिव देईन अशी धमकी देउन माझे पक्षकारास मानसिक त्रास दिला तसेच आपण डोक्याला पिस्तुल लावलेला फोटो माझे पक्षकाराचे फेसबुक व व्हॉटसअप वर पाठविला आहे ते सर्व फोटो माझे पक्षकाराकडे आहेत.
- सततच्या लग्नाच्या मागणीमुळे व आपण केलेल्या भावनिक संवादामुळे माझे पक्षकार व आपल्या आई, वडील, बहीण व इतर कुटुंबा समवेत चेंबुर शिंधी कॅम्प येथील प्लॅटवर दि. 14.01.2022 रोजी बौध्द रितीरिवाजाप्रमाणे लग्न झाले. या बाबतीत सर्व पुरावे माझे पक्षकाराकडे आहेत. आपण आपल्या नावाने सिम कार्ड दिलेले आहे. त्या सिम कार्ड मधील संवाद, फोटो व कॉल डिटेल रेकॉर्ड माझे पक्षकाराकडे आहेत, त्यावरद आपली आई शंकुतला व बहिण हर्षदा व शिल्पा यांचे संभाषणचे रेकॉर्ड सुध्दा आहेत.
- लग्नानंतर आपण माझे पक्षकारासो त पती पत्नी म्हणुन सिंधी कॉलनी, चेंबुर या ठिकाणी राहत असते व अधुन मधुन कामाच्या निमित्याने छत्रपती संभाजीनगर येथे येउन जाउन करीत असत. दरम्यान आपले व माझे पक्षकाराचे निथीमत शारीरिक संबंध राहिले आहे व त्यातुनच माझे पक्षकार गर्भवती राहिले असता आपण सध्यातरी आपलाला मुल नको म्हणुन आपण माझे पक्षकारचे गर्भपात केल्याबाबतचे कागदपत्री वैद्यकीय पुरावे आहेत.
- माझे पक्षकाराने गर्भपातानंतर आपल्या व कुटुंबातील इतर सदस्यांच्या वागण्या व बोलण्यामध्ये खुप काही बदल दिसुन आला व आपण चेंबूर येथील घरी येण्यासही टाळाटाळ करू लागले. त्यामुळे माझे पक्षकाराचे मनात आपल्या विषयी शंका निर्माण होउ लागली की आपण त्यांना आपल्या छत्रपती संभाजीनगर येथील घरी कधीही घेउन गेले नाहीत. माझे वडील आमदार आहेत, त्यांची समाजात प्रतिष्ठा आहे, माझी बहीण पायलेट आहे व मी सुध्दा शहराचा नगरसेवक आहे, आपण सामाजिकरित्या लग्न सार्वाजनिक करू तोपर्यंत तु सिंधी कॉलनी, चेंबुर या ठिकाणच्या प्लॅट मध्येच रहा. मी व माझे नातेवाईक संतत मुंबईला येत राहूत, तु काहीच काळजी करू नको अशी बतावणी करून तसेच भुल थापा देउन माझे पक्षकाराची दिशाभुल करीत होतात. यापूर्वी आपण सुनिता सिध्दांत सिरसाठ हिच्या बरोबर लग्न केल्याचे समजते, नंतर आपल्या सोबत कोमल साळवे यांच्यासोबत लग्न केले व ती सध्या आपल्या बरोबर राहते असे समजले. कारण आपणच ही बाब आपल्या मोबाईलवरून माझे पक्षकाराचे. व्हॉटसअपवर पाठवले. आपण व आपल्या घरातील आई, वडील व बहीण यांच्या कट कारस्थानामुळे व सध्याचे पालकमंत्री मा. संजयजी शिरसाठ यांच्या दबावामुळे घराची प्रतिष्ठा जाउ नये म्हणुन तु छत्रपती संभाजीनगर येथे येण्याची गरज नाही, तु चेंबुर येथेच राहा मी आठ दिवसाला नियमित येत जाईन तुला काही कमी पडू देणार नाही असे बोलुन तुम्हा माझे पक्षकारास धमकावले व खोटे आश्वासन दिले.
- आपण दिनांक 17.04.2022 रोजी माझे पक्षकाराची माफी मागुन तु कुणासीही चर्चा करू नकोस जर तु कुणासही वाच्यता केली किंवा पोलिसामध्ये तकार केली तर मी माझया डोक्यात गोळी घालून आत्महत्या करून घेईन व त्यात तुझे नांव टाकीन त्यामुळे तुझे कुंटूंब रस्त्यावर येईल व तु पुर्णपणे उध्दवस्त होशील अशी धमकी तुम्ही माझे पक्षकारास दिली. तुम्ही डोक्याला पिस्तुल लावल्याचा फोटो माझे पक्षकाराकडे आहेत. नंतर मात्र तु आईवडीलकडेच रहा या Flat ची दुरूस्ती करण्याचे आहे. वरील तारखेच्या वेळेस तुम्हचे नेहमी नाशिक येथील हेमांगी पवार या महिलांचे संभाषण चालु होते. त्यानंतर माझे पक्षकाराने तुम्हास जाब विचारला असता, तुम्ही असे सांगितले की सदर Flat विकी करून टाकला आहे, यापुढे मला कुठलाही फोन करू नकोस नसता मी तुझे सर्व कुटूंब गुंडाकडून खत्म करीन. माझे वडील मंत्री होणार आहेत व ते मुख्यमंत्री मा. शिंदे याचे उजवे हात आहेत. माझे पक्षकारने दिनांक 20.12.2024 रोजी पोलिस स्टेशन शाहूनगर, मुंबई येथे रितसर तकार केली मात्र मा. संजय सिरसाठ हे कॅबिनेट व छत्रपती संभाजीनगर चे पालकमंत्री झाल्यामुळे त्यांनी पोलिसावर दबाव टाकल्यामुळे कार्यवाही होउ दिली नाही.
- आपणास हया नोटीसद्वारे कळवण्यात येते की, आपण माझे पक्षकारास 7 दिवसांच्या आत नांदावयास घेउन जावे नसता माझे पक्षकार आपणा विरध्द व आपल्या कुटूंबाविरोधात मानसिक व शारिरिक छळ, केला व माझे पक्षकाराचे नावावर असलेला फॅट आपल्या नावावर न केल्यामुळे तसेच 50 लाख रूपये हुड्यापोटी न दिल्यामुळे आपल्या विरोधात महिला अत्याचार कायदा तसेच हुंडाप्रतिबंध कायदा तसेच इतर कायदयानुसार योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी तसेच या नोटीसचा खर्च रु 25000/- आपल्या कडून वसुल केला जाईल यांची नोंद घ्यावी. करीता ही कायदेशीर नोटीस.