Vidarbha Rain News : राज्यातील अनेक भागात दमदार पावसाने (Monsoon) हजेरी लावत सर्वत्र एकच दाणादाण उडवली आहे. या पावसानं अनेक शहरातील जनजीवन विस्कळीत केलं आहे. अशातच या पावसाचा फटका विदर्भातील (Vidarbha) अनेक जिल्ह्याला बसला असून नदी, नाले आणि सखोल भागात पाणीच पाणी झाले आहे. तर आज (28 मे)विदर्भातील वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती चंद्रपूरसह जवळ जवळ सर्व जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून (IMD) देण्यात आला आहे.
दरम्यान, पश्चिम विदर्भाची जीवन वाहिनी समजली जाणारी पूर्णा नदी यंदा मे महिन्यातच प्रवाहित झाली आहे. गेल्या अनेक दिवसापासून अकोला, वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यात बरसत असलेल्या पावसाने पूर्णा नदीला आज मोठा पूर आला आहे. मे महिन्यातच पूर्णा नदी प्रवाहित झाल्याने परिसरातील नागरिक आनंदित आहेत.
वीज कोसळल्याने चार जणांचा मृत्यू, तर पाच जण जखमी
विदर्भात पावसाने कहर केला असून अनेकांचे यात मोठं नुकसान झालं आहे. तर वेगवेगळ्या घटनांमध्ये अंगावर वीज कोसळल्याने चार जणांचा मृत्यू झालाय तर पाच जण जखमी झाले आहेत. यात पहिल्या घटनेत गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यात कालीमाटी परिसरात शेतात काम करणाऱ्या सतीश फुंडे या शेतकऱ्याचा वीज कोसळल्यामुळे मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या घटनेत चंद्रपूर जिल्ह्यात मारडा गावात वीज कोसळून एकाचा मृत्यू तर तिघे जखमी झाले आहे. या घटनेत पांदण रस्त्याचे काम सुरू असताना ट्रॅक्टर वर वीज कोसळली. पावसावेळी ट्रॅक्टरच्या आश्रयाने बसलेल्या आनंदराव वायरे यांचा मृत्यू झालाय. तर त्यांचे तीन सहकारी जखमी झाले आहे.

भंडारा जिल्ह्यातील खांबडी शिवारात हार्वेस्टरच्या माध्यमातून भात पीक कापणी सुरू असताना वीज कोसळल्याने एक महिला आणि हार्वेस्टर चालकाचा मृत्यू झाला आहे. तर इतर दोघे मजूर जखमी झाले आहेत. कांता जीभकाटे आणि विजय सिंह अशी मृतांची नावे आहेत.
बळीराजाला कृषी विद्यापीठाचा महत्वपूर्ण सल्ला
‘आपत्तीतून इष्टापत्ती’ अशी आपल्या मराठीत म्हण आहे. सध्या राज्यभरात सुरू असलेला धुवाधार मान्सूनपूर्व पावसासाठी ही म्हण तंतोतंत खरी ठरतांना दिसतीये. सध्या राज्यात सुरू असलेला मान्सूनपूर्व पाऊस हा खरिपासाठी अतिशय पोषक असल्याचं मत अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं व्यक्त केलंय. या पावसाचा खरिपातील पिकांसाठीच्या तण नियंत्रणासाठी मोठा फायदा होणार असल्याचं विद्यापीठानं म्हटलंय. सध्याच शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई न करण्याचं आवाहन विद्यापीठाने केलंय. हा पाऊस थांबल्यानंतर शेतकऱ्यांनी राहिलेली मशागतीची कामे पूर्ण करावी असा सल्ला कृषी विद्यापीठाने दिलाय. या पावसामुळे जमीन अधिक भुसभुशीत झाल्याने त्याचा फायदा मशागतीसाठी होणार असल्याचं विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी म्हटलंय. या पावसाचा फायदा भविष्यातील तण नियंत्रणासोबतच लागवडीनंतरच्या उगवणक्षमता वाढीसाठी होणार असल्याचं कुलगुरू डॉ. गडाख म्हणालेत.